Monday, September 18, 2006

पुस्तक परिक्षण -प्रो.जयन्त नारळीकर


लोकसत्ता रविवार दि.१३ एप्रिल २००३ लोकरंग पुरवणी त "ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी...........प्रश्नोत्तरातून सुसंवाद" या पुस्तकाचे प्रो.जयंत नारळीकर यांनी लिहिलेले परिक्षण
-----------------------------------------------------------------

अंधश्रद्धांकडे पाहण्याची चिकित्सक दृष्टि
भारत हा अनेक दृष्टीने वैधर्म्यांचा देश समजला जातो. बैलगाडी पासून जेट विमाने, मातीच्या झोपड्यांपासून गगनचुंबी आलिशान इमारती, वीज आणि पाणी दुर्मिळ असलेल्या खेड्यांपासून रात्रिचा दिवस करु शकणा-या रोषणाईत,खाद्यपेयात पैसा पाण्यासारखा खर्च करणा-या महानगरांपर्यंत मानवी जीवनाची दोन टोके आपण पहातो, पचवतो आणि दृष्टीआड करतो. पण या सर्व वैधर्म्यांइतकेच एक वेगळे वैधर्म्य देशात वाढत आहे.याची आपल्यापैकी बहुतेकांना जाणिवदेखील नसावी.
हे वैधर्म्य म्हणजे वैद्न्यानिक दृष्टीकोन आणि अंधश्रद्धा यांच्यातले! स्वातंत्र्यपूर्व काळात 'डिस्कव्हरी ऒफ इंडिया' पुस्तक लिहिताना जवाहरलाल नेहरुंनी अशी आशा व्यक्त केली होती, की स्वातंत्र्य मिळाल्यावर भारतीय जनता केवळा परंपरांचे अंधानुकरण न करता त्यातील युक्तिसंगत सार तेवढे घेईल आणि जीवनातले निर्णय घेताना वस्तुस्थितीची सप्रमाण दखल घेईल. परंतु आज स्वातंत्र्य मिळुन पाच दशके उलटली तरी अंधश्रद्धांचा पगडा होता तसाच आहे- नव्हे वाढतो आहे.असे विदारक दृश्य आज दिसते आहे.

काळ्या ढगांना चंदेरी किनार आहे, ती अशा काही निवडक संघटनांची आणि व्यक्तिंची ज्यानी काळाची गरज ओळखून आपापल्या परीने अंधश्रद्धांविरुद्ध मोहिमा उघडल्या आहेत. अंधश्रद्धांमागची कारणे शोधुन ती निराधार आहेत हे दाखवणे, तथाकथित चमत्कारांचे 'रहस्य' उलगडून दाखवणे,प्रत्यक्ष कृतिने आपले मत सिद्ध करणे आदि प्रकारांनी अंधश्रद्धांची जनमानसावरची पकड दुर करण्याचे प्रयत्न चालू आहेत. अशा प्रयत्नांची चर्चा करणारी पुस्तकेपण बाहेर येत आहेत, ही जमेची गोष्ट आहे.
अशा पुस्तकांत प्रकाश घाटपांडे यांच्या 'ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी' या पुस्तकाचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. मे २००१ मध्ये प्रथम प्रसिद्ध झालेल्या या पुस्तकाची दीड वर्षात दुसरी आवृत्ती निघावी, ही आनंदाची गोष्ट आहे. कारण या पुस्तकात घाटपांडे यांनी भारतातील सर्वाधिक प्रसार झालेल्या अंधश्रद्धेवर प्रकाश टाकला आहे.
'फलज्योतिष ही एक अंधश्रद्धा आहे' हे समजावून सांगायला लागणे आणि तेही निरक्षरांना नव्हे तर डिग्री विभूषितांना, उच्चपद्स्थांना, समाजधुरिणांनादेखील, इथेच खरी शोकांतिका आहे. अशा वेळी तुम्ही अंधश्रद्ध आहात, फसव्या विचारसरणी मागे धावून आपले हसे करुन घेत आहात.' वगैरे आक्रमक प्रचार योग्य ठरत नाही. लहानपणी सूर्य आणि वार्‍याच्य़ा चढाओढीची गोष्ट वाचली होती, त्याचा प्रत्यय येथे येतो. वारा आणि सूर्य दोघांपैकी कोण एका पादचार्‍याचा कोट त्याच्या अंगावरुन काढून दाखवेल, अशी स्पर्धा होती. वारा वेगाने वाहू लागला, तसे पादचा-याने कोट आवळून धरला. अखेर वाराच थकला. मग सूर्य पुढे आला. त्याने संथपणे प्रकाशणे चालू ठेवले आणि काही वेळाने पादचार्‍याने फार उकडायला लागले, म्हणून कोट काढला.
आक्रमक प्रचाराने अंधश्रद्धेचा कोट आणखी आवळुन धरला जातो. पण त्या व्यक्तिला सौम्य शब्दात पटवून दिले आणि त्याने स्वत:हून तो कोट काढून फेकून दिला तर ते जास्त प्रभावी ठरणार नाही का? घाटपांडे यांचा मार्ग वार्‍याचा नसुन सूर्याचा आहे.
१०२ पानांच्या या छोटेखानी पुस्तकात लेखकाचे मनोगत वाचले की त्याची शैली स्पष्ट होते. पुस्तकाच्या पहिल्या भागात ज्योतिषाबद्दल पुष्कळदा विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे दिली आहेत, तर दुसर्‍या भागात आधुनिक पार्श्वभूमीवर आधारित काही माहितीपूर्ण लेख आहेत. लोक कुठल्या कारणांनी फलज्योतिषाकडे जातात? त्यांना ज्या गरजा भासतात त्यांची पूर्ती करण्याचे सामर्थ्य या विषयात आहे का? फलज्योतिषाकडे जाणार्‍या 'जातका'ने ही प्रश्नोत्तरी वाचून मगच जावे कि नाही हा निर्णय घ्यावा असे लेखकाचे आवाहन आहे. हे प्रश्न कुठल्या प्रकारचे आहेत याची कल्पना खालील काही नमुन्यातून स्पष्ट होईल.
१) फल्ज्योतिष म्हणजे काय?
२) जन्मरास/जन्मनक्षत्र म्हणजे काय?
३) अमावस्या अशुभ दिवस आहे काय? अमावस्येला पौर्णिमेला वेडाचे/अपघाताचे प्रमाण जास्त का असते?
४) जुळ्या मुलांच्या कुंडल्यात फरक का असतो?
५) साडेसाती/कालसर्प योग/ ग्रहदशा म्हणजे काय?
६) ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो हे खरे आहे काय?
७) ग्रहांची शांती केल्याने फायदा होतो काय? ग्रहांचे खडे वापरुन अनिष्ट टळते का?
८) विवाह जुळण्याच्या वेळी पत्रिका बघावी का?
९) मंगळदोष म्हणजे काय?
१०) सिंहस्थात विवाह करु नये असे का म्हणतात?
११) फलज्योतिष विज्ञान आहे का? अशा सुमारे ६० प्रश्नांची चर्चा आणि उत्तरे यात आहेत. भृगुसंहिता,वास्तुज्योतिष नाडी आदींचीही थोडक्यात माहिती दिली आहे.प्रत्यक्ष दावे काय असतात आणि वस्तुस्थिती काय असते, याची पुराव्यानिशी माहिती लेखकाने दिली आहे.वाचकाला त्यातून एक संदेश मात्र स्पष्ट शब्दात मिळतो. आजवर फलज्योतिषाला विज्ञान म्हणण्याजोगे त्यात काहीही आढळले नाही.मोघम भविष्यवाणीत भाकित करण्याची शक्ती नाही. भाकित म्हणजे स्पष्ट शब्दात अमुक वेळी, अमुक स्थळी, अमुक घडेल हे सांगु शकणे. हे प्रश्न व त्यांची उत्तरे वाचून प्रत्येकाने ठरवावे, की ज्योतिषाकडे जावे का?
दुसर्‍या भागात स्फुट लेखात प्रथम फलज्योतिषाकडे वैज्ञानिक चिकित्सक दृष्टीकोनातून पाहिले आहे. त्यात फलज्योतिषांकडून वेळोवेळी केल्या जाणार्‍या युक्तिवादांचे खंडन केले आहे. इथे लेखकाला आणखी पुष्कळ सांगता आले असते. उदाहरणार्थ, मोठ्या प्रमाणात नमुने गोळा करुन, त्यांना संख्या शास्त्राचे निकष लावून भाकितांची तपासणी करण्यात आली आहे, पण ती मुख्यत्वे करुन पाश्चात्य देशात. अशा उदाहरणांत फलज्योतिषाला स्पष्ट भाकित करता येत नाही.( म्हणजे भाकित चुकिचे ठरते) हे सिद्ध झाले आहे. तसेच काही विशिष्ट प्रसंगी त्याची मानसिक परिस्थिती त्याला फलज्योतिषाकडे कशी आकर्षित करते, याची मानसशास्त्रज्ञांनी केलेली चिकित्सादेखील वाचनीय ठरली असती.
नाडी ज्योतिष, फेंग शुई वगैरेंवर वेगळ्या लेखात आणखी चर्चा आहे. विद्यापीठ अनुदान मंडळाने फलज्योतिषाचे अभ्यासक्रम चालवण्याचा निर्णय २००१ मध्ये घेतला व त्यानंतर वादाचे वादळ निर्माण झाले. 'वेदिक ऎस्ट्रॊलॊजी' म्हणुन या विषयाची केलेली भलावण वास्तविक किती निरर्थक आहे हे विरोधकांनी दाखवून दिले. उलट ग्रीस-बॆबिलॊनकडून आलेले हे 'इंपोर्टेड' लोण आपण 'वेदातून निर्माण केलेले ज्ञान' म्हणुन मिरवावे या सारखी हास्यास्पद ( की शोकास्पद?) गोष्ट कुठली असणार? या विषयावर काही ऐतिहासिक संदर्भ देउन हा लेख आणखी रोचक करता आला असता.
वरील काही बाबतीत सुधारणेला वाव असूनही हे पुस्तक वाचनीय आणि संग्रहणीय झाले आहे, यात शंका नाही. सर्वसामान्य वाचकांनी हे वाचून अंतर्मुख होण्याची गरज आहे. 'मानव हा बुद्धीसंगत विचार करणारा जीव आहे' हे वचन सार्थ करायला आपण सर्वांनीच आपल्या विविध अंधश्रद्धा चिकित्सक दृष्टीकोनातून पाहायला नकोत का?
'ज्योतिषाकडे जाण्यापूर्वी..." प्रकाश घाटपांडे; संज्ञा सर्व्हिसेस, पुणे मुल्य- ६० रु.
- जयंत नारळीकर

No comments: