Thursday, August 16, 2007

पंचांग एक अवलोकन


"पंचांग सोपे सुमंगल स्वभावे भिंतीवरी कालनिर्णय असावे". अशा जाहिराती वर्षाच्या शेवटी नववर्षाचे स्वागत करताना विविध माध्यमातून ऐकत असतो,पहात असतो. पण हा 'कालनिर्णय' नसून कालनिर्देशनाचा प्रकार आहे.निर्णय घेणारे तुम्ही कोण लागून गेले? तुम्हाला जर तुमची जन्मतारीख विचारली आणि तुम्ही जर त्याला ' माझा जन्म भारतीय सौर दिनांक अमुक अमुक रोजी झाला' किंवा भाद्रपद कृष्ण चतुर्थी शके १८८४ रोजी झाला 'असे सांगितले तर तो नक्कीच भारतीय असून सुद्धा विक्षिप्त नजरेने तुमच्या कडे बघेल.

पंचांगाचा उदय
मानव जसा उत्क्रांत होत गेला तशी त्याला दैनंदिन व्यवहारासाठी कालमापनाची व कालनिर्देशनाची गरज निर्माण झाली. शिकार ते शेती या प्रवासात शेती हा मुख्य मानवी जीवनाचे अंग झाल्याने निसर्गाच मानवी जीवनाशी नातं सांगणारे दिवस रात्र, उन, पाउस, थंडी, वारा,सागरातील भरती ओहोटी याचा अवकाशातील विशिष्ट ग्रह ता-यांच्या स्थितीशी संबंध हळूहळू लक्षात येउ लागला. समाजजीवनातील सर्व कृत्ये ही अप्रत्यक्षरित्या शेतीशीच निगडीत होउ लागली. इजिप्तमध्ये नाईल नदीच्या पुराशी लोकजीवन अवलंबून होते. त्यामुळे या संबंधांचे निरिक्षण करुन त्यावरुन काही आडाखे बांधता येउ लागले.यातूनच ज्योतिषशास्त्राचा म्हणजे आताच्या खगोलशास्त्रीय भागाचा उगम झाला. फार पूर्वी फलज्योतिष हा शब्द प्रचारात नव्हता.ज्योतिष किंवा ज्योतिःशास्त्र हा शब्द वापरात होता. ज्योति म्हणजे आकाशातील दिप्तिमान गोल.चंद्र, सूर्य, ग्रह. तारे इत्यादि.
ज्योतिष हे त्रिस्कंधात्मक आहे.

Tuesday, June 26, 2007

भारतीय ज्योतिषशास्त्र


ग्रंथप्रदर्शनातून बाहेर पडता पडता दुर्लक्षित ठिकाणी उपेक्षितासारखे पडलेले एक पुस्तक सहज दृष्टोत्पत्तीस पडल आणि मी ते डोळे झाकून खरेदी केलं. ते पुस्तक म्हणजे."भारतीय ज्योतिषशास्त्र अथवा भारतीय ज्योतिषशास्त्राचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास" ले. शं.बा.दिक्षित'. डॊ.थीबोसारख्या पाश्चात्य विद्वानाला हे पुस्तक मूळातून वाचण्यासाठी मराठी भाषा शिकावी लागली

शामभट्ट व त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत


शामभट्ट (एक नामांकित जोशी) आणि त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत

उपेक्षितांच्या दुनियेत काही गुणवंत माणसे जशी असतात तशी काही पुस्तकंही असतात. काळाच्या पडद्या आड माणसे असो वा साहित्य असो इतिहासात त्याची दखल घेतली तरी काळाच्या प्रवाहात ती गडप होउन जातात. एखादा सामान्य वकूबाचा माणूस देखील प्रसिद्धीचे तंत्र उमगल्यामुळे व्यवहारात यशस्वी होतो तर एखादा असामान्य माणूस देखिल प्रसिद्धीच्या झोतापासून लांब राहिल्याने दुर्लक्षित रहातो. पुस्तकांचही तसच आहे. एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात फलज्योतिष हा विषय मध्यवर्ती घेउन कुणी एखादी विनोदी कादंबरी लिहिली असेल असे कुणाला वाटत नाही.प्रो. नारळीकरांशी एकदा सहज गप्पा मारताना म्हणून या पुस्तकाचा परिचय करुन दिला. त्यांनी ते पुस्तक विमानप्रवासात वाचले. त्यांना ते पुस्तक खूप आवडले. ते पुस्तक म्हणजे शामभट्ट (एक नामांकित जोशी) आणि त्याचा शिष्य बटो यांचा वृत्तांत भाग १ ते ३, लेखक: चिंतामण मोरेश्वर आपटे

Wednesday, May 09, 2007

ज्योतिषाकडे जाण्यापूर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद


भाग १
कुंडली पंचांग राशी नक्षत्रे

१) फलज्योतिष म्हणजे काय़?२) पंचांग म्हणजे काय? त्याचा उपयोग काय?३) जन्मकुंडली म्हणजे काय?४) जन्मरास म्हणजे काय?जन्मनक्षत्र म्हणजे काय?५)नावावरुन रास कशी काढतात?६) प्रश्नकुंडली म्हणजे काय? ती मांडून उत्तरे कशी देतात?७) अमावास्या अशुभ दिवस आहे काय?८) अमावस्या, पौर्णिमेला शस्त्रक्रिया केल्यास रक्तप्रवाह जास्त होतो हे कितपत सत्य आहे?९) अमावस्या पोर्णिमेला वेडाचे झटके,अपघातचे प्रमाण जास्त का असते?१०) हिंदू धर्मात पावसाळ्यात जी नक्षत्रे सांगितली आहेत त्याच्या गुणधर्माप्रमाणे पाउस पडतो. असा अनुभव येतो.मग नक्षत्रे व मोसमी पाउस यांचा संबंध आहे का?११) तेरावी रास नवीन आल्यामुळे ज्योतिषातील सगळी गणिते बदलली का?१२) जन्मवेळ चुकली तर भविष्य चुकते का?१३) जुळ्या मुलांच्या कुंडल्यात फरक असतो का?

काही सामान्य शंका
१४) साडेसाती काय प्रकार आहे?१५) कालसर्प योग म्हणजे काय?१६) नारायण नागबली विधी काय आहे? तो कशासाठी करतात?१७) ग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते?१८)ग्रहदशा अंतर्दशा हा काय प्रकार आहे?१९) ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होतो हे खरे आहे काय?२०) काही ज्योतिषी आयुष्यातील घटना अचूक सांगतात ते कसे?२१) हिरोशिमा व नागासाकि शहरात अणुबॉंब पडला त्यावेळी लाखो लोक मेले, विमान अपघात. रेल्वे दुर्घटना वा भुकंप या सारख्या घटनांमध्ये शेकडो लोक मरतात मग त्या सर्वांच्या कुंडल्यात काय एकाच वेळी मृत्युयोग होता असे म्हणायचे का?२२) ज्योतिषांवर दुटप्पीपणाचा आरोप केला जातो. ज्योतिषी लोक खरोखरच दुटप्पी आहेत का?२३) ग्रहांना दैवी शक्तीची प्रतिके मानून त्यांना मानवी गुणधर्म माणसाने चिकटवले आहेत, डोळ्यांनान दिसणा-या परमेश्वराचे प्रतिक हवे म्हणून माणूस मुर्तीची स्थापना करतो व तिची आराधना करतो.तसेच ग्रहांच्या बाबतीत केले तर काय बिघडले?२४) ग्रहाची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय?२५) ग्रहांचे खडे वापरल्याने अनिष्ट प्रभाव कमी करता येतात का?२६) प्रयत्नाने भविष्य बदलता येते का?

विवाह, पत्रिका आणि ज्योतिष
२७)पत्रिकेचे गुणमेलन म्हणजे काय?२८)विवाह जुळण्याचे वेळी पत्रिका बघावी का?२९)मंगळदोष म्हणजे काय?३०) एकनाड असल्यास रक्तगट एक येतो व संतती होत नाही अथवा अडचणी येतात यात तथ्य काय?३१) मृत्यूषडाष्ट्क काय आहे?३२) मुहूर्त पाहणे योग्य कि अयोग्य?३३) गुरुबळ कशासाठी पहातात?३४) मूळ नक्षत्रावर जन्मल्यावर शांती करावयास का सांगतात?३५) मूळ नक्षत्र सास-यास वाइट,आश्लेशा नक्षत्र सासूस वाइट असे म्हणतात ते कितपत बरोबर आहे?३६) सिंहस्थात विवाह करु नये असे का म्हणतात?३७) गुरु संततीकारक ग्रह का मानतात?

फलज्योतिषाच्या विविध पद्ध्ती
३८) मेदनिय ज्योतिष हा काय प्रकर आहे?३९) राजकिय भाकिते कशी वर्तवली जातात?४०) भुकंपाचे भाकित वर्तवता येणे शक्य आहे काय?४१)भृगूसंहिता हा काय प्रकार आहे?भृगूसंहितेमध्ये जगातल्या सर्वांच्या कुंडल्या सापडतात कशा?४२) नाडी म्हणजे काय? नाडी भविष्य हा फलज्योतिषाचा प्रकार आहे का?४३) दक्षिण भारतात केवळ तुमच्या अंगठ्याच्या ठशावरुन तुमचे नाव,तुमच्या बायकोचे नाव,तुमची कुंडली तुमचा वर्तमान काळ,भूत, भविष्य सर्व काही प्राचीन ऋषींनी लिहिलेल्या ताडपट्ट्यावर सापडती ते कसे? याविषयी विंग कमांडर शशीकांत ओक यांनी 'नाडी भविष्य एक चक्रावून टाकणारा चमत्कार' व 'बोध अंधश्रदधेचा' या पुस्तकात स्वतः अनुभव घेउन लिहिले आहे. ते काय खोटे?४४) नॉस्त्रॅडॅमस ने जगाच्या महत्वाच्या घडामोडींचे भाकिते पुर्वीच वर्तवून ठेवली आहेत. त्यात भारत हे हिंदु राष्ट्र म्हणून जगभरात बलशाली राष्ट्र होइल असे म्हटले आहे.ते खरे आहे काय?४५) लोकमान्य टिळक यांचा ज्योतिषाचा चांगला अभ्यास असून त्यांचा त्यावर विश्वास होता असे म्हणतात ते खरे का?४६) वास्तू ज्योतिष काय प्रकार आहे?

फल ज्योतिष शास्त्र? प्रवाद, समजुती
४७) फलज्योतिष हे शास्त्र आहे काय?४८) हे गोकॅलिन चे संशोधन नेमके काय आहे?४९) चंद्र सूर्याचा गुरुत्वाकर्षणाचा परिणाम म्हणून भरती ओहोटी हा दृष्य परिणाम होतोच ना! मग त्याचप्रमाणे ग्रहांच्या गुरुत्वाकर्षण, चुंबकिय आकर्षण अशा शक्तींचा परिणाम आपल्यावर कशावरुन होत नसेल?५०) हे शास्त्र विद्न्यानावर आधारित आहे का?५१) हे शास्त्र विद्न्यानावर आधारित नाही तर वैद्न्यानिकांनी त्याविरोधी ठोस भुमिका का घेतली नाही?५२) जर ज्योतिष हे शास्त्र नाही तर वर्तमानपत्रे नियतकालिके राशी भविष्य का छापतात?५३) आमचा फलज्योतिषाचा अभ्यास नाही,तरी पण हे शास्त्र भ्रामक आहे हे आम्हास कसे कळावे?५४) राजकारणी, सिनेनट व्यावसयिक हे ज्योतिषाचा सल्ला घेतातच की?५५) लोकांना अनुभव येतो म्हणूनच हे शास्त्र टिकले ना? नाहीतर ते एक निरोपयोगी शास्त्र म्हणून फेकले गेले नसते का?५६) फलज्योतिषाचा मानसिक आधार म्हणून वापर होत असेल तर त्यात वाइट काय?५७) मग ज्योतिषाकडे जाणा-या माणसाला तुम्ही काय पर्याय द्याल?५८) दोन तज्न्य डॉक्टरांची तरी कुठे एकसारखी मते असतात मग दोन ज्योतिषांची भाकिते सारखीच असली पाहिजेत असा आग्रह का५९) विद्न्यान तरी कुठे परिपूर्ण आहे? मग ज्योतिषशास्त्र तरी कसे परिपूर्ण असेल?६०) फल ज्योतिष विद्न्यान नसेना का पण उपयुक्त तर आहे?६१) अहो ज्योतिष विषय विद्यापीठात सुद्धा शिकवला जातो ते काय उगीच का?६२) परदेशातील फलज्योतिषसंशोधनाची उदाहरणे नेहमीच उगाळली जातात मग आपल्या कडे या विषयावर संशोधन का केले जात नाही?६३) आतापर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ज्योतिषांना काय आव्हाने दिली? ती कोणी स्वीकारली अगर कसे?

भाग दोन
स्फुट लेखन

फल ज्योतिषः एक प्राथमिक चिकित्सक दृष्टिकोण
नाडी ज्योतिष आणि फलज्योतिष
फेंग शुई! वास्तुशास्त्राला चिनी चॅलेंज
यूजीसी आणि फलज्योतिष
फलज्योतिषचिकित्सेविषयी एरिक रेग यांनी संकलीत केलेले पाश्चिमात्य विचार
आखिल भारतीय ज्योतिषसंमेलन, सोलापूर २००१ च्या निमित्ताने

पुस्तक लेखमाला स्वरुपात वाचण्यासाठी शीर्षकावर टिचकी मारा.

पराधीन नाही जगती पुत्र मानवाचा...जयंत नारळीकर

सप्टेंबर-ऑक्‍टोबर १९७५ मधली गोष्ट. "द ह्यूमनिस्ट' नावाच्या अमेरिकेतील नियतकालिकात १८६ विख्यात शास्त्रज्ञांच्या सहीचे एक पत्रक प्रसिद्ध झाले. मानव जीवनावर ग्रहताऱ्यांच्या प्रभाव पडतो, ही कल्पना त्या पत्रकात स्पष्ट शब्दांत खोडून काढली होती. त्यातील काही मोजके उतारे पहा- ........"मानवाच्या जन्माच्या वेळी ग्रह-ताऱ्यांची स्थिती त्याच्या भवितव्यास आकार देते, ही कल्पना निव्वळ चुकीची आहे. दूरच्या ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे ठराविक उपक्रमांसाठी अमुक वेळ शुभ वा अशुभ असते किंवा एका राशीच्या लोकांचे विशिष्ट राशींच्या लोकांशी जुळणे वा न जुळणे हे सत्य नाही... आजकालच्या अनिश्‍चित वातावरणात पुष्कळांना महत्त्वाचे निर्णय घेताना मार्गदर्शनाची गरज भासते. म्हणून त्यांना वाटते, की त्यांचे भवितव्य त्यांच्या नियंत्रणापलीकडे तारकांच्या प्रभावाखाली ठरते; पण आपण सर्वांनी जगातल्या वास्तवाला तोंड देणे आवश्‍यक आहे; आपल्याला याची जाणीव बाळगायला पाहिजे, की आपली भविष्ये आपल्या हातात आहेत, तारकांच्या नाही.'
पत्रकावर सही करणारे विविध विषयांतले शास्त्रज्ञ होते. त्यांत नोबेल पारितोषिकविजेतेही होते. ही मंडळी सहसा एका व्यासपीठावर दिसत नाही; पण वरील पत्रकासाठी एकत्र येणे त्यांना आवश्‍यक वाटले, ही गोष्ट महत्त्वाची.
आपण जर एखादे पाश्‍चात्त्य वृत्तपत्र पाहिले, तर त्यात तारका-भविष्याला वाहिलेला कॉलम असतो; परंतु युरोप आणि अमेरिकेत दीर्घ काल वास्तव्य केल्यानंतर मी असे म्हणू शकतो, की अशा प्रकारच्या फलज्योतिषी रकान्यांत रस घेणारे वाचक असले तरी त्यावर विश्‍वास ठेवणारे थोडे-थोडकेच असतील. कुंडल्या जुळवून लग्न ठरवणे, चांगला मुहूर्त पाहून नव्या घरात प्रवेश करणे किंवा प्रस्थान ठेवून प्रवासाला निघणे, आदी वैयक्तिक जीवनातल्या क्रिया जशा भारतात मोठ्या प्रमाणात दिसतात, तशा या देशांत दिसत नाहीत. सार्वजनिक जीवनातदेखील मुहूर्त पाहून नव्या मंत्रिमंडळाला शपथ देणे, नवीन राज्याची सुरवात करणे, पंतप्रधान झाल्यावर शासकीय निवासात गृहप्रवेश करणे, अशा गोष्टींचा सुळसुळाट मी फक्त भारतात पाहिला. मला वाटते, वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात फलज्योतिषाच्या नादी लागलेला भारत हा एकमेव मोठा देश असावा.
मला या नादाचा फायदा कसा झाला, ते सांगतो! काही वर्षांपूर्वी माझ्या कॉलेजला जाणाऱ्या कन्येला स्कूटी घ्यायची होती. तिला घेऊन तिची आई स्कूटीच्या दुकानात गेली, तेव्हा कळले, की "वेटिंग लिस्ट' असल्याने दोन-तीन आठवडे थांबावे लागेल; पण तिथे बऱ्याच स्कूटी रांगेत उभ्या केलेल्या दिसल्या. ""इतक्‍या स्कूटी इथे असताना वेटिंग लिस्ट कशी?'' माझ्या पत्नीने विचारले. ""त्या "बुक' झाल्यात; पण कालपासून पितृपक्ष चालू झाल्यामुळे तो संपेपर्यंत त्या उचलल्या जाणार नाहीत.'' दुकानदार म्हणाला. ""मग आम्ही आज यातली एक विकत नेली तर तुम्ही तिच्याऐवजी एक पुढच्या १०-१२ दिवसांत आणून ठेवू शकता!'' माझी कन्या म्हणाली. ""आमची तयारी आहे,'' दुकानदार म्हणाला. ""पण पितृपंधरवड्यात अशी खरेदी करायला तुमची तयारी आहे?'' दुकानदाराने मुलीऐवजी आईला विचारले. तिने अनुमोदन दिले आणि स्कूटीचे पैसे भरून ती विकत आणली. अर्थात या "धाडसी' कारवाईमुळे आम्हाला आकाशातल्या कोणाचा कोप सहन करावा लागला नाही.
"फलज्योतिष हे विज्ञान आहे का?' हा प्रश्‍न मला पुष्कळदा विचारला जातो. त्यापाठोपाठ अशी टीकाही ऐकायला मिळते, की फलज्योतिषाचा अभ्यास व तपासणी न करता शास्त्रज्ञ त्याला "अवैज्ञानिक' ठरवून मोकळे होतात. वस्तुस्थिती वेगळी आहे. विज्ञानाचा किताब मिळवायला त्या विषयाला काही पथ्ये पाळावी लागतात. त्या विषयाची मूळ गृहीतके स्पष्ट मांडावी लागतात. त्यांच्यावर आधारलेला डोलारा कसा उभा केला जातो, ती कार्यपद्धती निःसंदिग्धपणे मांडायला हवी व शेवटी प्रत्यक्ष निरीक्षणातून खरे, खोटे तपासता येईल, असे भाकीत करावे लागते. भाकीत खरे ठरले का खोटे, हे तपासण्याचे संख्याशास्त्राचे नियम आहेत. उदाहरणार्थ, नाणेफेकीत "हेड' वर, का "टेल' वर, हे बरोबर भाकीत करता येते, हा दावा तपासून पाहायला एका नाणेफेकीने ठरवणे योग्य होणार नाही... शंभर वेळा नाणे फेकून आलेल्या निष्कर्षांना संख्याशास्त्राचे निकष लावून ठरवावे. कुंडल्या जुळवून केलेले विवाह कुंडल्या न जुळणाऱ्या असताना केलेल्या विवाहांपेक्षा अधिक यशस्वी, सुखी असतात का, हे तपासायला शेकडो जोडप्यांचे सॅम्पल तपासायला पाहिजे. अमेरिकेत अशा तऱ्हेने केलेल्या चाचणीत कुंडली जुळणे-न जुळणे याचा, विवाह सुखी होईल- न होईल याच्याशी काहीही संबंध नाही, असे आढळून आले.
फलज्योतिषाची कार्यपद्धती, मूळ गृहीतके आणि भाकिते यांबद्दल त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांत एकवाक्‍यता नसल्याचे दिसून येते. एकदा मी काही प्रख्यात फलज्योतिषांनी तत्कालीन राजकारण्यांबद्दल केलेल्या चुकीच्या भाकितांचा गोषवारा एका चर्चेत मांडला असता, येथील फलज्योतिषी म्हणाले, की भाकीत चुकले, कारण ते चांगले फलज्योतिषी नसावेत. अशा वेळी मला भारतीय क्रिकेट टीमच्या पराजयानंतर टीकाकारांच्या सल्ल्यांची आठवण होते. त्यांच्या मते, ज्यांना खेळवले गेले नाही, त्यांना घेतले असते तर निकाल वेगळा झाला असता.
पुष्कळदा फलज्योतिषाचे उदात्तीकरण करायला त्याचा संबंध वेदांशी जोडण्यात येतो; पण जन्मकुंडली मांडणे, जन्मवेळेच्या ग्रहांची स्थिती मानवाचे भवितव्य ठरवते, ही कल्पना हे सर्व वेदातले नसून, ग्रीक-बॅबिलोनियन प्रभावाखाली भारतात आले, असा इतिहास आहे. सूर्यसिद्धान्तातला एक श्‍लोक त्या बाबतीत बोलका आहे. त्यात सूर्यदेव मयासुराला सांगतो ः "तुला या विषयाची (फलज्योतिष) सविस्तर माहिती हवी असेल तर रोमला (म्हणजे ग्रीक-रोमन प्रदेशात) जा. तेथे मी यवनाच्या रूपात ही माहिती देईन.' "यवन' शब्दाचा वापर परदेशी, बहुधा ग्रीक, अशा अर्थी होतो. म्हणजे आपली ही अंधश्रद्धा मूळ भारतीय नसून "इंपोर्टेड' आहे!
खुद्द ग्रीकांमध्ये ही अंधश्रद्धा कशी आली? आकाशातल्या तारकांचे अनेक वर्षे निरीक्षण केल्यावर त्यांना आढळून आले, की आकाशातल्या तारामंडळाच्या पार्श्‍वभूमीवर काही तारका अनियमितपणे मागे-पुढे जात आहेत. त्यांच्या या स्वैरगतीमुळे ग्रीकांनी त्या तारकांना "प्लॅनेट' म्हणजे "भटके' हे नाव दिले. त्यांच्यापैकी वैज्ञानिक वृत्तीच्या लोकांनी या स्वैरगतीमागे काहीतरी नियम असेल, तो शोधायचा प्रयत्न केला; पण बहुसंख्य लोकांनी या स्वैर फिरण्याचा अर्थ "या भटक्‍यांमध्ये काही तरी खास शक्ती आहे ज्यामुळे ते मनमाने फिरतात,' असा लावला. त्यातून पुढे जाऊन असाही समज करून घेतला, की हे ग्रह आपल्या शक्तीचा वापर मानवाचे भवितव्य ठरवण्यात करतात.
पण कालांतराने ग्रह असे का फिरतात, याचे उत्तर विज्ञानाने दिले. ऍरिस्टार्कस, आर्यभट, कोपर्निकस, गॅलिलिओ, केप्लर, न्यूटन अशा मालिकेतून अखेर गुरुत्वाकर्षण हे मूलभूत बळ ग्रहांना सूर्याभोवती फिरवत ठेवते, हे सिद्ध झाले. म्हणजे ग्रह स्वेच्छाचारी नसून, सूर्याभोवती फिरायला बांधले गेलेत. अशा तऱ्हेने विज्ञानाने फलज्योतिषाच्या मुळाशी असलेला भ्रमाचा भोपळाच फोडला. आज अंतराळ युगाला प्रारंभ होऊन अर्धशतक उलटले. मानवाने चंद्रावर पदार्पण केले. मंगळावर याने उतरवली. इतर ग्रहांजवळ अंतराळयाने पाठवून त्यांचे जवळून दर्शन घेतले. दर वेळी गणिताबरहुकूम यान प्रवास करते. नियोजित ग्रहाजवळ नियोजित वेळी जाते. यानातली दूरसंचार यंत्रणा ठरल्याप्रमाणे चालते. यावरून मानवाची कर्तबगारी तर दिसतेच; पण त्याचबरोबर ग्रहांच्या गतीमागे कसलेही रहस्य राहिले नाही, याचीदेखील कल्पना येते. ही कर्तबगारी दाखवणारा मानव पराधीन खचित नाही.
ही विज्ञानाची प्रगती विचारात घेतल्यावर आजही जेव्हा मला एखादा शिकलेला माणूस विचारतो, की ग्रहांचे मानवजीवनावर परिणाम होतात का, तेव्हा मला आश्‍चर्य आणि खेद, दोन्ही अनुभवायला मिळतात. आश्‍चर्य यासाठी, की एकविसाव्या शतकातला मानव हा प्रश्‍न विचारतोय. खेद यासाठी, की विचारणारा भारतीय आहे.
- जयंत नारळीकर (लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)

धोंडोपंत उवाच: ज्योतिषावरून वादंग

धोंडोपंत उवाच: ज्योतिषावरून वादंग

हा ब्लॉग फलज्योतिषाविषयी काही माहिती देतो. या ब्लॉगची सजावट सुंदर आहे.कोकणातील छान फोटो आहेत.