Thursday, February 27, 2014

आल्या आल्या लोकसभेच्या निवडणुका!

आता २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे.ज्योतिषांच्या भाकितांचे आता प्रमाण वाढू लागेल.उमेदवार आता ज्योतिषांचे सल्ले घ्यायला लागतील. मेदिनीय ज्योतिषाच्या आधारे ही राजकीय/निवडणुकीची भाकिते वर्तवली जातात.मेदिनीय ज्योतिष म्हणजे देश, प्रांत यांचे भवितव्य सांगणारी ज्योतिष शाखा. यात हवामान, राजकीय बदल, सामाजिक स्थित्यंतरे, सृष्टी-चमत्कार, क्रांती, भूकंप, युद्धे, दंगली इ. गोष्टींचा मागोवा घेतात. यात देश, प्रांत, शहर, राजकीय पक्ष यांना सुद्धा राशी बहाल केल्या आहेत. उदा. आधुनिक भारताची रास मकर आहे. आता ही सुद्धा कशी? १ नोव्हे.१८५८ रोजी इंग्लंडच्या ईस्ट इंडिया कंपनीचे भारतावरील वर्चस्व संपून राणीच्या राजसत्तेचे वर्चस्व चालू झाले. या अर्थाने आधुनिक भारताचा जन्म झाला. मग अगोदर भारत नव्हता का? हा प्रश्न इथे निरर्थक आहे. भारताचे भाकीत वर्तवताना आधुनिक भारताची पत्रिका, १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला म्हणून स्वतंत्र भारताची पत्रिका, २६ जाने १९५० ला भारत प्रजासत्ताक झाला म्हणून ती पत्रिका, सत्तेवर असलेल्या पक्षाची पत्रिका, पंतप्रधानांची पत्रिका वगैरे अनेक पत्रिका विचारात घेवून भाकीत वर्तवले जाते. कॉंग्रेसची पत्रिका कुठली तर २८ डिसेंबर १८८५ म्हणजे पक्षस्थापनेची. त्यानंतर भारत स्वतंत्र झाला कॉंग्रेसमध्ये विभाजन होत गेले तरी पत्रिका तीच. पोर्तुगीजांनी ब्रिटीशांना मुंबई बेट आंदण म्हणून दिले ती मुंबईची पत्रिका. असे प्रातांचे जन्म धरून त्यांच्या पत्रिका तयार केल्या आहेत. इंदिरा गांधी १९७७ ची निवडणूक हरल्या कारण त्यांनी अमावस्येला फॉर्म भरला होता असं अजंता जैन या राजकीय भाकीत वर्तवणाऱ्या ज्योतिषाने सांगितले होते. १९९१ च्या निवडणूका व राजीव गांधींची हत्या ही कोणालाही सांगता आली नाही. बहुसंख्य ज्योतिषांनी राजीव गांधींच पंतप्रधान होणार असे सांगितले होते. ( पहा साप्ताहिक सकाळ २७ एप्रिल १९९१. व इलस्ट्रेटेड विकली २५-३१ मे १९९१)

Monday, February 03, 2014

भविष्य कुठल्या कारणामुळे चुकते??

वर्तमानपत्रातील ज्योतिषांच्या जाहीराती मोठ्या गमतीशीर असतात. दैनिक सकाळच्या पहिल्या पानावर 
मोठ्ठी जाहिरात असते.'पुणेकरांचे श्रद्धास्थान' असलेल्या आदिनाथ साळवी सरांचा शब्द म्हणजे ब्रह्मवाक्यच. जाहिरातीत भाकित खरे ठरल्याचा एखाद्या व्यक्तिचा अनुभव असतो. जर विवाह होणार असेल तर कुठे? कधी?कोणाशी? जोडीदाराचा स्वभाव कसा असेल? तो नोकरी का व्यवसाय करत असेल? त्याचे रंग रुप व्यक्तिमत्व आर्थिक परिस्थिती कशी असेल? विवाह नात्यात होईल का? प्रेमविवाह, पळून जाउन कि ठरवून? तो जातीचा असेल की परजातीचा? विवाहास जास्त खर्च तर येणार नाही ना? तो बिजवर व्यसनी नंपुसक, लफंगा तर नसेल ना? तो दीर्घायु आरोग्यसंपन्न आहे का? घरातील माणसांशी पटेल ना? ग्रहदोष दूर होउन वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी अत्यावश्यक धार्मिक उपाय, उपासना व प्रार्थना कोणती करावी? असे प्रश्न सर्वसामान्य लोकांच्या मनात असतात. ते जाहीरातीत लिहिले असतात. जाहिरातीत हल्ली पुढे असेही लिहिले असते कि खालील कारणाने सांगितलेले भविष्य चुकीचे ठरु शकते