Saturday, March 01, 2014

दाते पंचांगातील सन २०१४ चे राजकीय भविष्य

ज्योतिषी विजय केळकर पुणे यांचे लोकसभेच्या निवडणुकांबाबत दाते पंचांगात पान नं ७९ वर खालील राजकीय भविष्य आलेले आहे.भविष्याची भाषा व व्याप्ती पहा.कुठलीही राजकीय घटना या व्याप्तीत सहज बसवता येईल.
========================================================================
पंचांगाचे २०१४-१५ साल भारताच्या दृष्टीने महत्वाचे ठरणार आहे. कारण ह्याच वर्षात लोकसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या कालावधीमध्ये चंद्रग्रहण सूर्यग्रहण आणि रवी शनी प्रतियोग होणार आहेत. हे सर्व ग्रहयोग भारताच्या मकर लग्नाच्या पत्रिकेत दशम स्थान व चतुर्थ स्थानात होत आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या दृष्टीने राजकारण हा एक गूढ विषय झाला तर आश्चर्य नाही.
सत्तेवरील कॉंग्रेस पक्षाची पत्रिका मीन लग्नाची आहे. नोव्हेंबर २०१४ पर्यंत शनीचे भ्रमण ह्या पत्रिकेत अष्टमस्थानातून होईल. फेब्रुवारी १४ मधे मंगळ याच स्थानात हजेरी लावेल आणि तेथुन तो वक्री मार्गी स्थितीमधे जवळ जवळ जुलै मध्यापर्यंत राहील. अर्थातच सत्ताधारी पक्षाला ही निवडणुक जिंकणे अतिशय जड जाईल. कॉंग्रेस पक्षाला आपले राजकीय वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी पुर्वी कधी नव्हती इतकी तडजोड करावी लागेल. श्रीमती सोनिया गांधी यांची पत्रिका कर्क लग्नाची आहे. त्यांचे पत्रिकेनुसार एप्रिल ते जुन १४ या कालावधीमधे गुरुचे व्ययस्थानात तर शनीचे भ्रमण चतुर्थस्थानात असल्यामुळे पक्षातील सदस्यांनी केलेल्या चुका त्यांना महागात पडतील.अर्थातच इतर पक्षांशी हातमिळवणी करावी लागेल. पण कॉंग्रेस पक्षाची पत्रिका जुन नंतर बलवत्तर होत जाईल. कारण गुरु पक्षातील पत्रिकेत पंचम स्थानात आणि सोनिया गांधींच्या पत्रिकेत लग्नस्थानात प्रवेश करेल. त्यानंतर कदाचित हीच कॉंग्रेस पार्टी नेतृत्व देउ शकेल.मात्र त्यापुर्वी पक्षाला अग्निपरिक्षेतून जावे लागणार हे निश्चित. हे सर्व ग्रहमान पाहता असे वाटते की सार्वत्रिक निवडणुकांमधे हा पक्ष सरळमार्गाने सत्तेवर येउ शकणार नाही. पण ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर या पक्षाचे पारडे जड होईल. दरम्यान च्या काळा मधे मध्यावधी निवडणुका पुन्हा घ्याव्या लागण्याची परिस्थिती निर्माण होईल.